Skip to main content

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !


ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम

वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते


या गाण्याची ओळी गेली अनेक वर्षे  मनात रुंजी घालताहेत पण नक्की का आणि काय वाटतंय हे व्यक्त व्हायला मात्र आजचा दिवस उजाडला. निमित्त आषाढी एकादशीचं. जशी आषाढी एकादशी जवळ येते, वारीची क्षणचित्रे आणि बातम्या येऊ लागतात तसं  मन भूतकाळाचा वेध घेऊ लागतं. आणि याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे  माझे आजी आजोबा. आता आजोबांना जाऊन १५ आणि आजीला जाऊन ५ वर्षे होऊन गेली पण ह्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी मात्र आजही मनात तितक्याच स्पष्ट. कदाचित वाढत्या वयाबरोबर  आणि अनुभवाबरोबर जाणीवा  अजूनच तीव्र झाल्या असतील कदाचित. आणि म्हणूनच आज हा लेखनप्रपंच.

गेले काही वर्षं मी न चुकता व्हाट्सअँप स्टेटस ला एक फोटो आणि ओळ लावते, ती म्हणजे " आषाढी एकादशी म्हणजे तुमची आठवण येतेच. साक्षात विठोबा रखुमाईच !! "

तर ही  गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या विठोबा रखुमाईची म्हणजेच माझे आजी आणि आबा. (माझ्या आईचे आई वडील ) यांची . सुधा आजी म्हटलं कि आजही डोळे मिटल्या वर गोरीपान, हसतमुख, बेताची उंची, गोबरे गाल, मोठं कुंकू, विरळ पण काळेभोर केस चापून  बसवलेले, गडद रंगाची साडी आणि डोळ्यात खूप सारी माया अशी छबी डोळ्या समोर उभी राहाते. आणि भाऊ आबा म्हटलं की  उंचे  पुरे, मोठे कपाळ, मऊ पांढरे केस, डोळ्याला चष्मा, स्वच्छ सुती  पांढरा शुभ्र शर्ट, कडक शिस्त  आणि आश्वासक नजर असे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते.   

तर आमचे आबा हे  दरवर्षी ना चुकता एकादशी ला वारीबरोबर मिरज ते पंढरपूर असे चालत जात असत. जवळपास 4० वर्षे. आणि ते नेहमी सांगायचे की इतके अंतर चालणे म्हणजे शारीरिक ताकद तर हवीच पण मानसिक सामर्थ्य ही तितकेच किंवा कदाचित जरा जास्तच महत्वाचे.   

माझ्या आजोळी अगदी पंजोबांपासूनची पंढरपूर वारीची परंपरा ऐकण्यात आहे. बरं हे सगळं आपापले घर संसार आणि पोटापाण्याचे उद्योग करायचे तर मग काही तडजोडी कराव्या लागायच्या. मग आबांचे आतेभाऊ व बिझनेस पार्टनर राजाबापू रानडे आणि  भाऊ आबा आलटून पालटून आषाढी, कार्तिकी, माघी इत्यादी वारीला जायचे नियोजन करायचे . आणि खरंच या प्रक्रियेमध्ये किती तरी गोष्टी अनुभवायला, शिकायला मिळतात. जसे कि  Social skills, mind control, relationship building, hardwork, patience, adjustments, आणि बरंच काही . बरं हे सर्व नेटाने इतके वर्ष करण्यासाठी त्यांना लागणारी शिदोरी, लाडू, फराळ, करून देणे यामध्ये आजीची तितकीच आनंदाने साथ असायची.

स्वतःच्या आवडीनिवडी आणि व्यक्तिगत जबाबदाऱ्या सांभाळून या दोघांनी मिळून अनेक जणांचे संसार मार्गी लावले. मग ते अगदी शिक्षणासाठी कोणाला ठेवून घेणे असो की कोणाचे लग्न ठरवणे एखाद्या चांगले वाईट कार्य पार पाडणे अगदी खर्चाचा हातभार लावण्यापासून ते कष्टांनी मदत करण्यापर्यंत तिथे उभे राहण्यापर्यंत सर्व काही करताना त्यांना मी पाहिले व ऐकले आहे.आणि म्हणतात ना एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हेही तितकेच प्रत्ययाला आलेले. माझी आजी ही त्या वेळची मॅट्रिक पास असूनही समाज रचनेप्रमाणे नोकरी उद्योग करणे याला घरी पाठिंबा नसेल पण तरीही जे पदरात पडले आहे ते एक्सेप्ट करून आपला एक स्वतःचा रोल तयार करून तो ठामपणे निभावणे हे मात्र शिकण्याजोगे आहे.  शिवणकाम, स्वयंपाक या क्षेत्रात कामगिरी करून त्यात समाधान मानणे असो किंवा मुलींना शिकवून मोठे करणे स्वतःच्या पायावर उभे राहणे इथे पासून ते कोणाचा बाळंतविडा करणे असो की सणावाराची तयारी असो आजीचा उत्साह अतिशय वाखाणण्याजोगा असायचा. मिरज मध्ये दवाखान्या साठी, उपचारासाठी अनेक ओळखीचे लोक  येत असत तर त्यांना घरी ठेवून घेऊन, दवाखान्यात डबे पोहोचते करणे, स्वतः डॉक्टरांना भेटायला जाणे इथे पासून लागेल ती सर्व मदत हे आनंदाने करत असत. कितीतरी गरीब घरातील मुलींना शिवणकामाचा मोफत क्लास देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम आजीने  केले आहे. शेजारीपाजारी कोणी बाई बाळांतीण होणार असेल तर तुपाचा डबा, डिंकाचे अळीवाचे लाडू, गरम मऊ भात, लोणचे याचा डबा घेऊन आजीची पहिली हजेरी असे. याच सोबत विविध घरगुती औषध उपचारांचा बटवाच आजीकडे होता, ज्याचा उपयोग वेळोवेळी तिने अनेकांना मोफत करून दिलेला आहे. अगदी माझे लग्न आणि सणवार इथं बसून तर बाळंतपणापर्यंत प्रत्येक कार्यात हिचा असलेला दांडगा उत्साह आणि खंबीर साथ मला आजही आठवते.

बरं या दोघांबद्दल बोलायचं झालं तरी या पिढीने कधी एकमेकांना गुलाबाचे फुल दिले नसेल किंवा कधी रोमँटिक कॅन्डल लाईट डिनरलाही गेले नसते पण अहोंना ना वेळेवर बाहेर पडता यावे म्हणून पोहे, उपम्यातील कढीलिंब मिरच्या सुद्धा वेचून काढून नाष्टा सर्व्ह करणे हे आजकालच्या काळात पाहायला मिळणे दुर्मिळ नाही तर अशक्यच म्हणा ना. अगदी ‘या हृदयीचे त्या हृदयी घातले’ या उक्तीची प्रचितीच!

माझा आजोळ गावातच असल्याने आबांचे वारंवार आमच्या घरी येणे जाणे असायचे मग आमच्या कॉलेज ऍडमिशन, करिअर याविषयी चर्चा असो किंवा समाज रचनेप्रमाणे लग्न केलेच पाहिजे, का आपली बुद्धी वापरून समाजकार्याला वाहून घेता येईल  इथंपर्यंतच्या विषयावरही आम्ही मोकळेपणाने चर्चा करत असू. तसेच एखादे नाटक सिनेमा पाहून आल्यानंतर ते पाहिलं हे बरोबर आहे पण अजून काय शिकलात काही शिकण्यासारखं नवीन मिळालं का याबद्दलही चर्चा केलेल्या माझ्या आजही आठवणीत आहेत. तसेच  आपण अभ्यास करावा, चांगली प्रगती करावी यासाठी खूप मोटिवेशनही द्यायचे. मला गाडी चालवण्याचे प्रचंड वेड असल्याने, मला त्यांनी कबूल केले होते की तू सांगलीतून पुणे युनिव्हर्सिटी मध्ये एम. एस. सी. साठी ओपन कॅटेगरी आणि त्यात इतर युनिव्हर्सिटी साठी असलेली एक सीट यासाठी मेरीट मध्ये ऍडमिशन मिळवून दाखव तर मी तुला नवीन बाईक घेऊन देईन. आमच्या दुर्दैवाने बाईक घेऊन ते चालवलेली पाहेपर्यंत ते राहिले नाहीत पण ॲडमिशन मिळाल्याचे मात्र त्यांनी पाहिले आणि ऐकले होते.

खरंतर माझ्या आईच्या काळात अतिशय शिस्तप्रिय, कठोर आणि शिक्षणापेक्षा संस्कार आणि घर संसारच महत्त्वाचे असा ठाम विश्वास असणारे आमचे आबा मात्र माझ्या पिढीला येईपर्यंत आता संस्कार आणि घर संसार या सोबतच शिक्षण आणि करिअरही केले पाहिजे या विचारापर्यंत आले होते. आणि कमाल म्हणजे माझ्या एम. एस. सी. ऍडमिशन च्या वेळेस आपल्या ओळखीतील परिचित यशस्वी अशा लोकांकडे मला घेऊन गेले होते विविध क्षेत्रातील माहिती आणि करिअर स्कोप इत्यादींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी. यासोबतच प्रॅक्टिकल नॉलेज हे प्रत्येकाला असलंच पाहिजे आणि व्यवहार ज्ञान हे शिकलेच पाहिजे यावर खूप भर होता. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी तुम्हाला घरातील बेसिक इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, फर्निचर इत्यादी  छोटी मोठी रिपेयरीची कामे आली पाहिजेत किंवा किमान त्याबद्दल जिज्ञासा असावी म्हणजे ते प्रश्न आपण उत्तम रीतीने मार्गी लावू शकतो असा यांचा ठाम विश्वास, जो आजही मला विशेषतः भारताबाहेर राहिल्यानंतर किती महत्त्वाचा होता ह्याचे पदोपदी प्रचिती येते. आजी आबांची अजून एक गोष्ट शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे अनेक नातेवाईक आणि अनेक तऱ्हेचे नातेवाईक असूनही सर्वांना सांभाळून घेणे, तुझे माझे असे न करता स्वतःच्या मुली, भाच्या, पुतण्या किंवा अगदी नातवंडांमध्ये सुध्दा काही मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता सगळ्यांना तितक्याच आत्मीयतेने वागवत असत. उदाहरणार्थ मावशी आणि मामा यांना मुले होती त्यामुळे त्यांच्या मुंजीला पळी आणि पंचपात्र दिले तेव्हा आम्ही दोघी मात्र बहिणीच म्हणून मग मुंजी ऐवजी इतर काही निमित्ताने त्यांनी आम्हाला सुद्धा चांदीची पाणी प्यायची भांडी भेट म्हणून दिली होती.

आणि बहीण भावंडांमधलं प्रेम काय असतं आणि ते कसं निभावायचं असतं, हे मात्र त्या पिढीकडून आम्हाला शिकायला मिळाले. एकमेकांच्या चांगल्या वाईटाला धावून जाणे, खंबीर साथ म्हणून उभे राहणे म्हणजे काय असतं याचं साक्षात उदाहरणच होतं घरी. आता आजी आबाही राहिले नाहीत आणि आमचं अजोळ संपलं, मात्र त्यांनी दिलेली चांगल्या विचारांची, संस्कारांची शिदोरी मात्र आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ असा आत्मविश्वास आहे.


सौ. श्रुति भिडे हिंगे 

१७/०७/२०२४


Comments

Popular posts from this blog

Reading- The key to learning

Reading- The key to learning Reading is to the mind what exercise is to the body. As a 21 st century teacher and parent, I feel it is very important to develop a habit of reading in early childhood. I still remember my school days when we used to have a library period once in a week. That day used to be a treat for a book lover girl like me. When our class teacher walked in with librarian madam and a bag full of books, we used to be super happy. That day we used to get a chance to choose a story book and enjoy it for a week. Along with this, I was lucky enough to get few teachers who were passionate about reading and books that always motivated us to read good books and increase our knowledge in various areas. On the other hand at home, my parents always encouraged me to read by bringing new books, asking me to discuss and write about it, visiting books exhibition and libraries and so on. That helped me to find the most loyal friend- book! Now a days there are numerou...

मैत्री

"मैत्री " मैत्री म्हणजे काय असतं ? प्रेम असतं विश्वास असतो …. लांबच लांब गप्पा मारताना कुणीतरी अगदी जवळचं असतं . … एक हक्काचा सुरक्षित ठिकाण असतं जिथं आपलं मन मोकळं करत असतो …. ओळख ही मैत्रीची पहिली पायरी असते व्यक्तीची आधी ओळख होते …. मग विचारांची ओळख होते नंतर मना -मनांची पारख होते…. प्रिझम मधून प्रकाशाचे इंद्रधनू तयार होते तसेच भावनांच्या विचारांचे जग सार्थ होते …. मैत्रीमध्ये काही थोडे गुण दोष असतात पण सात रंग एकत्र येउन अधिक सुंदर दिसतात …. श्रुति