रक्षाबंधन आज रक्षाबंधन! बहिणीने भावाला राखी बांधून आपल्या रक्षणार्थ सदैव सोबत असण्याची आठवण करून देणारा आणि बहीण- भावाचे नाते साजरे करण्याचा दिवस. लहानपणी राखीपौर्णिमा म्हणजे शाळेला सुट्टी आणि गोड-धोड खाऊन भरपूर भेटवस्तू घेऊन दंगा- मस्ती करण्याचा दिवस इतकीच समजूत होती. पण या निमित्ताने मला शाळेतील एक प्रथा आठवतेय ती म्हणजे रक्षाबंधनाला आम्हाला अनाथ आश्रमातल्या मुलांना राखी बांधायला नेलं जायचं आणि त्यांना सख्खं भावंड नाही म्हणून आपण त्यांना आनंद द्यायला एक दिवस केलेला प्रयत्न हा एक अर्थ कळला होता. तसेच सीमेवरच्या जवानांना राखी पाठवून आपल्या संरक्षणार्थ केलेल्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणखी एक स्वरूप. पण आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक नवीन अर्थ मांडावासा वाटतोय. तो म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व पुरुषवर्गाचा आपल्याला असणारा आधार आणि पाठिंबा ज्या मुळे आज आपण इतक्या बिनधास्तपणे जगभर फिरू शकतो. आणि कळत- नकळत ही सुरक्षितता प्रदान करणाऱ्या माझ्या सर्व बंधूंसम असणाया मित्रवर्गाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ! श्रुति भिडे - हिंगे