" पाऊस "
यंदा इकडे जरा जास्तच पाऊस पडतोय असं गेल्या काही दिवसात बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की इकडे नुसताच पाऊस पडतोय पण आपलं नातं अजूनही आपल्या देशात पडणाऱ्या पावसाशी च जोडलं गेलंय.. कुठेतरी वाचनात आलेल्या ओळी आठवल्या " पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं."
' ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा' इथं पासून ते ' पाऊस असा रुणझुण ता पैंजणे सखीची स्मरती ' इथं पर्यंत सर्व गाणी, गोष्टी आणि आठवणी डोळ्यासमर येऊन जातात. काही वर्षांपूर्वी पावसांत भिजण्यासाठी केलेला हट्ट आणि आज मात्र धो धो पाऊस कोसळत असताना पावसाचा प्रत्येक थेंब चुकवून कोरडे राहण्याचा अट्टाहास!!
भारतात असताना पावसाळा म्हटलं की एक वेगळीच मौज असायची. आभाळ भरून आलं, वारा सुटला की एक अनामिक हुरहुर लागून राहायची. गच्चीवर जाऊन पावसात चिंब भिजून यावं, आकाशात सुरेख इंद्रधनू पाहावं, वाहत्या पाण्यात कागदी होड्या सोडाव्यात, हिरवागार निसर्ग पाहावा, ओल्या मातीचा वास नाकात आणि मनात भरून घ्यावा आणि तृप्त मनाने घरी यावं तर आई गरमागरम चहा, भजी आणि टॉवेल घेऊन स्वागताला उभी. अजून काय हवं मग आयुष्यात ? मग त्या वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत एखादं आवडीचं गाणं ऐकत नाहीतर पुस्तक वाचत खिडकीत बसून पाऊस अनुभवायचा.
वाढत्या वयाबरोबर आणि बदलत्या काळाबरोबर मग सगळंच बदलत जातं. गाव बदलतो, देश बदलतो आणि आपली भूमिका सुद्धा. आता नुसताच पाऊस येतो आणि जातो पण मनमनातला पाऊस मात्र लांब निघून चाललाय असं वाटत असतानच एके दिवशी आपली छोटीशी मुलगी जेव्हा उत्साहानं पावसात भिजायचं म्हणते आणि आपल्यालाही सोबत घेऊन जाते तेव्हा अचानक आपण लहान होऊन भिजायला जातो तेव्हा नव्या पिढी सोबत नव्याने भेटतो ' पाऊस!!! '
सौ. श्रुति भिडे - हिंगे
Comments
Post a Comment