मॅपल ट्री
यशराज फिल्म्सच्या मोहोब्बतें सिनेमाच्या सुरुवातीला टायटल पडतात तेव्हा वाऱ्याबरोबर वाहत येणारी आणि तेव्हा पासून मनात भरलेली ती मॅपल ट्री ची पाने वास्तवात पहिल्यांदा पाहायला मिळाली ती युरोपात आल्यानंतर. गेल्या दोन तीन वर्षांत नियमितपणे मला दिसणारी मॅपल ट्री आणि तिच्यातील बदल यातून प्रेरणा घेऊन काही लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न!
भारतातून युरोपात आल्यानंतर अनेक गोष्टी मला नवीन होत्या त्यातील काही भावल्या तर काही खटकल्या. पण या मध्ये ऋतूंबद्दल खूप काही पाहायला अनुभवायला मिळालं आणि नकळत च त्याबरोबर काही विचार चक्रं चालू झाली. भारतात जसे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू प्रामुख्याने दिसतात तसे इकडे स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर असतात आणि त्यातले नैसर्गिक बदल अगदी ठळकपणे अनुभवता येतात. त्यातलं एक माध्यम म्हणजे इथली झाडं. त्यातलंच माझं एक आवडतं झाड म्हणजे मॅपल ट्री..
माझ्या घराच्या खिडकीतून दिसणारी ती मॅपल ट्री म्हणजे माझी नॉर्वेतली पहिली मैत्रीण! प्रत्येक वेळेस मैत्रीण म्हणजे कोणी व्यक्तीच हवी आणि ती बोललीच पाहिजे असं नाही हे मला पहिल्यांदा लक्षात आलं. कारण मैत्रीण जशी आपल्याशी बोलते, आपलं बोलणं ऐकून घेते आणि आपल्याला काही चांगले सल्ले देते तश्याच अनेक गोष्टी मलाही या मॅपल ट्री कडून शिकायला मिळाल्या म्हणून मैत्रीण !
ऑटम मध्ये मी पहिल्यांदा जेव्हा तिला पाहिलं तेव्हा सुंदर अशा रंगीबेरंगी पानांचा पोशाख करून जणू माझ्या स्वागतालाच उभी होती. या ऋतूमध्ये सर्वच झाडे खूप सुंदर रंग ल्यालेली असतात. लाल, पिवळी आणि नारिंगी पाने जागोजागी दिसतात आणि आता लवकरच हिवाळा चालू होणार याची जणू सूचना देत असतात. या काळामध्ये मॅपल ट्रीची दिवसागणिक थोडी थोडी पाने गळत असतात पण तरीही ती शांत स्तब्ध उभी असते. त्यानंतर येतो तो विंटर. अतिशय तीव्र थंडी, वारं, पाऊस, बर्फ, अंधार सगळं काही सहन करूनही त्याच दिमाखात न डगमगता उभी असते. उलट एकावर एक स्नोचे थर पांघरून, त्याचीच सुंदर शाल पांघरून उभी असते इतरांना आधार द्यायला . तिलाही त्रास होत असेलच की, तिला ही थंडी नकोशी वाटत असेलच की पण तरीही प्रचंड सहनशक्ती असलेल्या कणखर स्त्री सारखी ही पण उभी असते उगवत्या सूर्याची वाट पाहात . मग एकदाचा स्प्रिंग येतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट, ऊन पावसाचा खेळ यातून बदललेल्या हवामानाचा अंदाज द्यायला. या नंतर काही दिवसातच या मॅपल ट्री ला परत एकदा पालवी फुटते आणि ती हिरवीगार पाने आणि रंगीत फुले असं मोहक रूप धारण करते. जरी तिला माहिती ती असतं कि परत एकदा पानगळ होणार,परत एकदा थंडी येणार सारं जगच बदलून जाणार पण तरीही या सगळ्या नैसर्गिक चक्रात ती त्याच आत्मविश्वासाने उभी असते.. मॅपल ट्री !!!
सौ. श्रुति भिडे हिंगे
Comments
Post a Comment