गेले ४-५ महिने नॉर्वेमध्ये आल्यापासून मी दररोजच सार्वजनिक वाहनातून जाणं -येणं होत असतं. त्या दरम्यान प्रवासात केलेल्या निरीक्षणावरून हा देश, इथली माणसं, यांची संस्कृती याचे वेगवेगळेअनुभव येत असतात.
युरोपातले देश हे आशियाई देशांपेक्षा पैसा आणि तंत्रज्ञान याबाबतीत प्रगत आहेत, त्यामुळे मला पुण्यात स्वतःच्या कारमधून फिरणे आणि इकडे ऑस्लोमध्ये बस, ट्राम किंवा ट्रेनने फिरणे यात फार फरक वाटला नाही. मुळातच इकडे लोकसंख्या कमी असल्याने खूप गर्दी, धक्काबुक्की हा प्रश्नच नाही आणि दुसरं म्हणजे इथल्या लोकांची शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा. कोणत्याही बसथांब्यावर गेल्यानंतर तिथे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या बसेस/ ट्राम्सचे वेळापत्रक लिहिलेले असते आणि त्यांचे मार्गही नकाशाद्वारे दाखवलेले असतात. आणि पुढची गाडी किती वेळाने आहे याचे तपशील सुद्धा डिस्प्लेबोर्डवर अचूक दर्शवलेले असतात . आणि खरंच ठरलेल्या वेळेप्रमाणे गाडी येते! काही वेळा गाडीला समस्या आल्यास ट्रॅफिक कंट्रोल ची दुसरी गाडी येऊन पहिली गाडी पुनर्स्थित केली जाते. बसमध्ये चढल्यावर आपला पास, तिकीट किंवा मोबाईल ऍप वरचं तिकीट दाखवून चढायचं म्हणजे विनातिकीट प्रवाशांची संख्या आपसूकच ताब्यात राहते आणि त्या व्यतिरिक्त अचानक पणे तिकीट तपासणी सुद्धा केली जाते. बस मध्ये बसल्यावर समोर स्क्रीनवर बसच्या मार्गावरचे पुढचे थांबे आणि तिथे पोहोचायला लागणारा अंदाजे वेळ अशी माहिती दिसत असते. ज्या व्यक्तीला पुढील थांब्यावर उतरायचे असेल त्याने आपल्या जवळचं स्टॉप चं बटण दाबायचं, किंवा थांब्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीने हात दाखवायचा तरच बस थांबते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि सोयही होते. बसमध्ये लहान मुलांनी सीटबेल्ट लावण्याचा नियम असो किंवा वयस्कर व अपंग लोकांसाठी विशिष्ठ जागा असोत नाहीतर लहान बाळांचे स्ट्रोलर येण्यासाठीचा दरवाजा असो किंवा फूटपाथजवळ कमीत कमी अंतरावर बस थांबवण्याची पद्धत असो, यामुळे प्रवास जास्तीत जास्त सुखाचा होतो हे नक्की.
या सगळ्या तांत्रिक सोयी सुविधांबरोबरच प्रवासातील खरी गम्मत तर सहप्रवासी कोण यावर असते. त्यामुळे बसस्टॉप वरचे लोक, ड्रायव्हर, आजूबाजूला बसलेली आणि उभी असणारी माणसं आणि लहान मुलं व त्यांच्या बरोबरचे संवाद यांचे अनेक अनुभव येतात. त्यापैकी काही असे-
मी ऑस्लोमध्ये अगदी नवीन असतांना चुकून भलत्याच बसमध्ये चढले आणि ५ मिनिटांनी लक्षात आलं की हा रस्ता अगदी च अनोळखी अहे. तेव्हा मला शहरातील रस्त्यांची विशेष माहिती नव्ह्ती आणि मोबाईलवर इंटरनेट पण चालू झालं नव्हतं. तेव्हा ड्रायव्हरला विचारले मग त्यांनी मला पुढच्या स्टॉप वर उतरून कोणत्या नंबरची बस पकडायची ते सांगितले आणि मग थोड्या उशिरा का होईना पण मी सुखरूप घरी पोहोचले .
असेच एकदा बसमधून जातांना एका थांब्यावरून बस निघणार इतक्यात एक आजी भली मोठी बॅग कशीबशी ओढत येताना दिसल्यावर बस बंद करून ड्रायव्हर काका उतरले आजींची बॅग उचलून आत आणली, आजी आत येईपर्यंत शांतपणे वाट पहिली आणि मग आजी व्यवस्थित बसल्याचे आरशातून पहिले आणि मग बस चालू केली. तेव्हा माणुसकीचे उत्तम दर्शन झाले.
सकाळच्या वेळेस ठराविक गाड्यांना शाळेच्या मुलांची आणि पालकांची बरीच गर्दी असते . एका बस थांब्यावर एकदम ३-४ लहान मुले चढल्यावर ड्रायव्हर काकांनी उभे राहून सांगितले की मोठ्यांनी उठा आणि लहान मुलांना बसायला जागा द्या, या वरून ड्रायव्हर काकांची मुलांच्या प्रती काळजी पाहून चांगलं वाटलं पण लोकांनी आपणहून मुलांना जागा न दिल्याने ड्रायव्हर काकांना हे सांगायला का लागलं हे सुद्धा बरंच काही सांगून गेलं.
आपल्या भारतीय चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लोकं पहिलं कौतुक करतात ते आपल्याकडच्या खाद्यपदार्थांचं ! पण तेव्हा प्रश्न पडतो कि एवढी समृद्ध भारतीय संस्कृती असताना लोकांना आपली वैशिष्टपूर्ण खाद्यपरंपरा इतकीच ओळख असावी का? आणि मग वाटून जातं की आपल्या देशाची बहुआयामी ओळख आपणच करून देण्याची गरज आहे .
काही वेळा २०-२५ वर्षांपासून इकडेच स्थायिक झालेले लोक पण आपलं मन मोकळं करतात . अगं मुली, आम्हाला इथे येउन खूप वर्षं झाली, आता आम्ही पैसा तर खूप कमावला पण आमची मुलं पक्की युरोपियन झाली आहेत आणि आम्ही तर मनाने भारतीयच आहोत अजून. त्यामुळे भौतिक गोष्टीत सुख मानून आला दिवस जगायचा इतकंच !!
म्हणूनच म्हटलं कि Public Transport हे खरंच दळणा वळणाचे साधन नाही तर देश व संस्कृती समजून घेण्याचे साधन आहे. ज्यामुळे माझे अनुभव विश्व रोज नव्याने समृद्ध होत आहे .
सौ. श्रुति भिडे - हिंगे
सौ. श्रुति भिडे - हिंगे
Comments
Post a Comment